सध्याच्या लहान मुलांचा विचार केला तर असे दिसून येते की, ग्रामीण अथवा शहरी दोन्ही भागातील मुले ही कुपोषितच आहेत. ग्रामीण भागातील कुपोषण हे पोषक घटक योग्य मात्रेत न मिळाल्याने होते, तर शहरी भागातील पोषक घटक अधिक मात्रेत आणि अयोग्य पदार्थातून मिळाल्यामुळे होते.
मुलास जन्म देणारी आई ही बालकाच्या गर्भावस्थेतील शारीरिक तसेच मानसिक वाढीसाठी सर्वात मोठे धन असते. आईच्या शरीरातून पाझरणारा रस हा गर्भानालेद्वारे मुलाच्या शरीरापर्यंत पोहोचतो आणि मुलाच्या वाढीसाठी उपयोगी ठरतो. जन्मास येणारे मूल हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुद्दृढ होण्यासाठी ह्या रसामध्ये सर्व प्रकारचे पोषकघटक असणे अतिशय आवश्यक असते.
आयुर्वेदशास्त्र या पोषक घटकांचा विचार या आहारातून तयार होणारे धातू घटक किती चांगले आणि सुदृढ उत्पन्न होतील यादृष्टीने करतो. यालाच सारता असे म्हणतात. यानुसार बालकामध्ये जर रस धातू खूप चांगला निर्माण झाला असेल तर ते बालक रससार, रक्त धातू जर चांगला निर्माण झाला असेल तर ते बालक रक्तसार, मांसधातू जर योग्य असेल तर मांससार याप्रमाणे मेदसार, अस्थिसार, मज्जासार, शुक्रसार अशी वेगवेगळ्या सारतेच्या व्यक्ती निर्माण होत असतात.
बालकाचे सर्वच धातू घटक सारवान होण्यासाठी गर्भधारणा होताना पुढील घटकांचा विचार होणे आवश्यक आहे.
१. पालकांचे योग्य वय
२. पालकांचा गर्भधारणेपूर्वीचा आहार आणि विहार (चलन वलन)
३. आईने गर्भधारणा चालू असताना घेतलेला आहार आणि विहार
४. मुलाने घेतलेला आहार.
ज्याप्रमाणे एखादे झाड चांगले वाढण्यासाठी त्याचे बीज, ते पेरण्याचा काळ, त्याला मिळणारे पाणी आणि इतर घटक आणि ते जिथे पेरले जाईल ती माती हे सर्व घटक अतिशय उत्तम असणे आवश्यक असते. त्याप्रमाणे, मूल सुदृढ आणि आरोग्यपूर्ण होण्यासाठी खालील घटक उपयोगी असतात –
आई-वडिलांकडून मुल होण्यासाठी आवश्यक बीज (स्त्री/पुरुष बीज)
ते बीज रुजण्याचा काळ(ऋतु)
त्याला मिळणारे पोषक घटक(मातेचा आहार) आणि
ते जिथे रुजेल ती आईची योनी(क्षेत्र) या सर्व गोष्टी योग्य असायला हव्या.
या सर्वांसाठी मुळात आई-वडिलांनी घेतलेला आहार आणि त्यांच्या शारीरिक आणि मानसिक अवस्था यांवर सारे अवलंबून असते. अपत्यनिर्मितीसाठी उपयुक्त असे आई-वडिलांचे बीज योग्य तयार होण्यासाठी आणि आईची योनी जी शेताप्रमाणे पोषणास उपयोगी ठरते, त्यासाठीही त्यांनी घेतलेला आहार-विहारच महत्वाचा असतो. त्यामुळे केवळ योग्य कालावधी सोडल्यास इतर सर्व घटक हे आहारावर अवलंबून असतात. येथे आपण आईच्या गर्भारपणातील आणि बालकाच्या ५ वर्षापर्यंतच्या आहाराचा त्याच्या स्वास्थ्यावर होणारा परिणामाचा विचार करणार आहोत.
आईचा आहार –
आईचे बीज चांगले होऊन योग्य अपत्यनिर्मितीसाठी आईचा आहार हा अगदी लहानपणापासूनच योग्य असायला हवा. जर तो नसेल तर योनीची वाढ व्यवस्थित होणार नाही. पोषणमुल्ये योग्य असलेल्या आहाराचा जर विचार केला तर भारतात घेतला जाणारा आहारच येथे विचारात घेणे आवश्यक आहे. हा आहार कोणत्याही वयात पोषणमुल्ये देणाराच ठरतो. आधुनिक शास्त्रात वर्णन केलेले पोषक घटक जसे कार्बोहायड्रेट, प्रथिने, फॅट, आणि मिनरलस इ घटक हे सर्व, भारतात रोज घेतल्या जाणाऱ्या घरगुती आहारातूनच उत्तम प्रकारे मिळतात. भारतीयांच्या रोजच्या ताटामध्ये मीठ, लिंबू, चटणी, कोशिंबीर, वरण/आमटी, भात, पोळी, भाजी आणि एखादा गोड पदार्थ असे सर्व घटक असतात. आयुर्वेदशास्त्रानुसार विचार केल्यास यातून गोड, आंबट, तिखट, खारट, तुरट आणि कडू हे सहाही रस मिळू शकतात. त्यामुळे असा आहार हा परिपूर्ण मानता येतो. अशा स्वरूपाचा आहारच आयुष्यभर घेणे योग्य असते. मात्र सध्या सतत समोर दिसणारे बेकरी प्रोडक्टस आणि जंक फूड यामुळे आपण आपले आणि मुलांचे आरोग्य बिघडून घेत आहोत.
आईने गर्भधारणेपूर्वी जर असा संपूर्ण आहार रोज व्यवस्थित घेतला तर तिला बीजदुष्टीमुळे होणाऱ्या समस्यांना जसे PCOD, Fibroid सामोरे जावे लागणार नाही आणि योग्य स्वरुपात गर्भधारणा होईल. अशी गर्भधारणा झाल्यानंतर मात्र आहारामध्ये काही प्रमाणात बदल करावे लागतात. आयुर्वेदामध्ये गर्भधारणा होण्यापूर्वी स्त्री आणि पुरुषाने वेगवेगळा आहार घेण्यास सांगितले आहे. पुरुषाने गोड पदार्थांनी युक्त असा तूप आणि दुधासहित आहार घ्यावा तर स्त्रीने तिचे स्त्रीबीजास पोषक असा तेल आणि उडीद इ पदार्थांनी युक्त म्हणजे काहीसा कडू रसाचा आहार घ्यावा. अश्याचप्रकारे गर्भकामना करणाऱ्या जोडप्यानेही तांदूळ, यव इ सह दही, मध आणि तूप यांनी युक्त असा आहार सेवन करावा. यामुळे गर्भबीजाची वाढ चांगली होते.
एकदा बीजस्थापन झाल्यानंतर पहिल्या महिन्यापासून बीज गर्भाशयात रुजून त्याची वाढ सुरु होणे अपेक्षित असते. गर्भधारणेच्या सर्व महिन्यांमध्ये आईच्या शरीरात अनेक बदल घडायला लागतात. भूक वाढायला लागते. अनेक स्त्रियांना सकाळी घरकामामुळे खाण्याची सवय नसते, त्यामुळे त्यांच्या शरीरात पित्तदोष वाढू लागतो. तर काहीजणी अतिभुकेमुळे अधिक प्रमाणात खातात अथवा काहींच्या शरीरात पूर्वीपासूनच अशुद्ध घटक असतात. त्यामुळे, अशा स्त्रियांना या काळात उलट्यांचा त्रास सुरु होतो. या उलट्या होऊ नयेत आणि तसेच बालक सुद्दृढ आणि आरोग्यपूर्ण होण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांनीही गर्भधारणेपूर्वी जर शोधन कर्म (वमन/विरेचन) करून घेतले तर हा उलट्यांचा त्रास कमी प्रमाणात होतो अथवा
होतही नाही असे दिसून आलेले आहे. तसेच उलट्या होत असताना सकाळी उठल्यावर पातळ पदार्थ घेऊ नयेत आणि सुरुवातीपासूनच थोडे लंघन(हलका आहार) ठेवावा. या तीन महिन्यांमध्ये पुन्हा गर्भस्त्रुती म्हणजेच (Missed-Carriage) होण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते. ती होऊ नये म्हणून दर महिन्यात घेण्यात येणाऱ्या आहार आणि औषधांचे वर्णन आयुर्वेदात आहे. अनेकवेळा या काळात डोहाळे लागले या कारणास्तव नको ते पदार्थ खाल्ले जातात. त्यामध्ये पाणीपुरी, भेळ सध्या पिझ्झा, बर्गर यांसारखे पदार्थ असतात. हे पदार्थ गर्भवाढीसाठी योग्य नसतात. त्यामुळे ते घेणे टाळावे.
पहिल्या महिन्यापासून ते नवव्या महिन्यापर्यंत दुध आणि तूप यांनी युक्त असा आहार घ्यावा. दूध आणि तूप हे गर्भाची योग्यप्रकारे स्थापना करून त्याची वाढ होण्यास उपयोगी ठरते. तूप हे भूकही वाढवते. शरीरात ताकदही वाढते. साधारण ७ व्या महिन्यापासून तर तुपाने सिद्ध औषधीसुद्धा घेण्यास सांगितल्या आहेत. हे सर्व घेत असताना आपल्या भुकेवर लक्ष देणेही आवश्यक असते.
प्रसूतीनंतरही काही औषधांनी युक्त असे तूप घ्यावे, ज्याने प्रसूतीनंतरचा रक्तस्त्राव सुलभ होतो. गर्भधारणा आणि प्रसूतीमध्ये स्त्री शरीरात खास करून पाठीच्या कण्यामध्ये बदल झालेले असतात. यावेळी रक्तवाढीसाठी आणि अस्थिधातूच्यावाढीसाठी पोषक असा आहार आणि द्रव्ये घ्यावीत. त्यामध्ये बाजरीची भाकरी, अहलीव/डिंक यांनी बनवलेले लाडू, भाताची पातळ पेज, अथवा मूग वा मसूर इ डाळींचे सूप, मटण सूप, लसूण, धने, जिरे घालून घ्यावे. या सर्वांमध्ये तुपाचा वापर असावा. सिद्ध तुपाचा वापर केल्यास अधिक फायदा होतो. प्रसूतीनंतर गरम पाणी प्यावे. त्यानेही शरीरात वाढलेले दोष (प्रामुख्याने वात दोष) कमी होण्यास मदत होते.
प्रसूतीनंतर दूध येण्यासाठी शतावरीसिद्धदूध अथवा विविध प्रकारच्या खीरींची रोज सकाळी न्याहारी असावी. गोड, आंबट अशा स्वरूपाचा आहार असावा. दुधापासून बनवलेले पदार्थ जसे पनीर, चीज यांच्यापेक्षा प्रत्यक्ष दुध, तूप आणि लोणी यांच्यावर भर असावा. पनीर, चीज हे पदार्थ पचनासाठी अधिक जड असतात. मांसाहाराचा उपयोगही गर्भाची वाढ आणि प्रसूतीनंतर होतो. मात्र मांस घेताना मटन सूप घ्यावे. जेवणानंतर पचनासाठी तुरट रसाचा विडा घ्यावा. त्याने घेतलेला आहार योग्य प्रकारे पचतो.
रक्तवाढीसाठी काळ्या मनुका, डाळिंब, बीट, गाजर, पालक यांचा वापर करावा. अस्थिधातु योग्य राहण्यासाठी दुध, लोणी, तूप, खारीक, डिंक तसेच अंडी, गव्हाच्या पोळ्या अथवा मटन सूप इ चा वापर करावा. नैसर्गिक पदार्थांवर भर द्यावा. ताज्या भाज्या आणि ताजे पदार्थ खावेत. एकूण गर्भधारणा आणि प्रसूती या काळात शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित रहावे, यासाठी प्रयत्न करावा.
प्रसूतीनंतर मूल ६ महिन्याचे होईपर्यंत पूर्णत: आईच्या दुधावर असते. आजकाल बऱ्याच मुलींना दूध कमी येते. याची कारणे पाहिल्यास करियर चालू ठेवण्यासाठीची धडपड करणे, स्नेहभाव कमी होणे/असणे, आई होण्याची मानसिकता नसणे इ असू शकतात. ६ महिन्यानंतर मुलाला आईच्या दुधाबरोबरच वरचे अन्न सुरु करावे. बाहेरचे दुध चालू करायचे असल्यास गाईचे दुध वा बकरीचे दुध त्यात विडंग अथवा सुंठ पावडर घालून निम्मे दुध आणि निम्मे पाणी घालून उकळून द्यावे. सहसा बाहेरचे प्रीझर्व्हेटीव घातलेले पदार्थ टाळावेत. त्याऐवजी वरणाचे पाणी, मुगाचे पातळ सूप, तसेच भाताची पेज इ चालू करावे. एक वर्षानंतर बालकाला संपूर्ण आहार सुरु करावा. त्यामध्ये भात, वरण, पोळी, भाजी असे पदार्थ चालू करावेत. बालकाला सहाही रस कसे देता येतील असा विचार सतत बालकाला जेवण देताना असावा. पूर्वीपासूनच सर्व रस पोटात गेल्यास मूल पुढे मोठे झाल्यावर कोणत्याही भाज्या खाण्यास सहसा नकार देत नाही. यामध्ये गोड रस म्हणून साखरे ऐवजी गुळ घ्यावा. आंबट-गोड पदार्थांचा वापर करावा. आंबट पदार्थात लिंबू, चिंचा, कैरी, विविध फळे यांचा वापर आपल्या जेवणात करावा. कडू रसासाठी कारले आणि मेथ्या दाणे यांचा वापर असावा. तिखट रसामध्ये मिरची ऐवजी लाल तिखट वापरावे. तुरट रसासाठी आवळा, डाळिंब रस, याचा वापर करावा. गोड, कडू आणि तुरट रस वाढीसाठी उपयोगी असतात. आंबट आणि खारट पदार्थ पचनासाठी उपयोगी असतात. तिखट आणि कडू रस स्थौल्य कमी करण्यासाठी उपयोगी असतात.
आजकाल बेकरी पदार्थ आणि इतर जंक फूड खाऊन मुलांमध्ये स्थौल्य अधिक प्रमाणात वाढते. तसेच, मुलींमध्ये यामुळे होर्मोनल बदल दिसून येतात. लवकर चष्मा लागणे, केस पांढरे होणे, केस गळणे, त्वचारोग, इ अनेक रोग लहान वयातच पाहायला मिळतात. अगदी १५ वर्षापासून काही मुलींना थायरोईड आणि बीजग्रंथी असतात. हे सर्व आजार टाळण्यासाठी आहारावर नियंत्रण असणे अतिशय आवश्यक आहे.
प्रथम ६ वर्षापर्यंत मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच बौद्धिक वाढ होत असते. ही वाढ योग्य होण्यासाठी त्यांचा आहार योग्य पचणे हे आवश्यक असते. अपाचित आहार जसा शारीरिक घटक दुर्बल करतो, तसेच त्यामुळे मानसिक आणि बौद्धिक चालनाही बिघडू शकते. आहार घेताना मन प्रसन्न नसल्यास तो आहार योग्य मानसिक भावना निर्माण करण्यास उपयोगी ठरत नाही. त्यामुळे रोग, मत्सर, द्वेष इ मानसिक भाव उत्पन्न होतात, जे आरोग्यासाठी घातक असतात. तसेच, आहार घेताना त्यावर पूर्ण लक्ष असणे आवश्यक असते. त्यामुळे सर्व पदार्थांची चव कळून त्यापासून धातूनिर्मिती योग्य होते. टीव्ही अथवा रेडीओ लावून अथवा कोणाशी वाद घालत आहाराचे सेवन केल्यास त्या आहाराचे पचन शरीरात व्यवस्थित होत नाही असे आयुर्वेदशास्त्र सांगते.
अजल्पन् अहसन् तन्मना भुञ्जीत |च. वि. १.
आहार घेताना आपल्यपेक्षा मोठ्या व्यक्ति, घरातील पाळीव प्राणी, घरात आलेले पाहुणे यांना प्रथम विचारून मग जेवायला बसावे. मोठ्यांनी असे केल्यास अनुकरणाने मुलेही पुढे असे वागायला शिकतात. जेवताना काही प्रार्थना म्हणून जेवण घेतल्यास मन प्रसन्न राहते आणि आहाराचे योग्य पचन होते.
धुवा हात पाय चला भोजनाला | बसा नीट येथे तुम्ही मांडी घाला |
नका मागू काही अधाशीपणाने | नका टाकू काही करा स्वच्छ पाने |
जय जय रघुवीर समर्थ ||
Let's be assured that you have a Real Life Insurance Policy with us - SSM Ayurveda Healthy and Pleasant life through Ayurveda.
Follow us
ssmayurveda@instagram
ssmayurveda@twitter
ssmayurveda@youtube
Our website
www.ssmayurveda.com
For more updates, join our telegram group - https://t.me/joinchat/Fknelt9VC-YcAXg4
Comments