top of page
Search
Writer's pictureSSM Ayurveda

आरोग्य शिक्षण - पालक, शिक्षक आणि समाजाची गरज!!!

Updated: Feb 21, 2023

कोरोनाने हात धुवायला शिकवले, कोरोनाने नमस्कार करायला शिकवले; अशा प्रकारचे अनेक लेख आजकाल वाचायला मिळतात. त्यात अजून एक आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोरोनाने आरोग्य टिकवायला शिकवले. याचा दुसरा अर्थ असा की आपल्याकडे आरोग्य नाही आणि त्याबाबतचे शिक्षण देण्याची यंत्रणाच नाही.

लहानपणी अभ्यास करताना आरोग्याचे शिक्षण मिळते, ते असे की आपल्या शरीरात काही गोष्टी न गेल्यास विविध कमतरता (deficiencies) होतात. आता ह्या कमतरता भरून काढण्यासाठी एकतर त्याच्या समान गोष्टींचे सेवन करण्यास शिकवले जाते. नाहीतर मोठे झाले, की त्या कमतरता भरून काढण्यासाठी गोळ्या घेण्यास डॉक्टरांकडून सुचवले जाते. उदा. लोहाच्या कमतरतेमुळे रक्तक्षय होतो (HB कमी होते). मग पुस्तकात लिहिलेले असते की लोह वाढवणारे पदार्थ खावेत अथवा गोळ्या खाव्यात. मुळात ही कमतरता कशी होते, त्याची इतर कारणे काय आहेत, कोणते पदार्थ अधिक प्रमाणात गेल्याने ही कमतरता होऊ शकते या सर्व गोष्टी सर्रास दुर्लक्षित केल्या गेल्या आहेत. मुळात भरल्या सुखवस्तु घरात राहणाऱ्या व्यक्तींनाही सर्व प्रकारचे घटक असलेले पदार्थ मिळूनही ह्या कमतरता कश्या निर्माण होतात? हे कोणीच लक्षात घेत नाही. खरेतर, ह्या कमतरता होण्यामागे केवळ त्याप्रकारचे पदार्थ न घेणे हे कारण नसून शरीरात ते पोषक पदार्थ जाऊनही, त्यांना पचवायला लागणारा घटक, ज्याला आपण "अग्ंनि" म्हणू; तोच योग्य नाही हे लक्षात घेतले जात नाही. ह्या अग्निकडे लक्ष दिले गेले तर अनेक रोगांपासून दूर राहता येऊ शकते. अशा पद्धतीने आरोग्य जपता येते असे शिक्षण आपल्याला कोणीच कधी देत नाही.

मग, पुढे एकतर काही व्यक्ती काही काळ त्या कमतरता दूर करण्यासाठी तश्याप्रकारचा आहारसेवन करतात आणि मग केवळ पूर्वीच्या रिपोर्टमध्ये बदल दिसून आला की तो आहार सोडून देऊन पुन्हा येरे माझ्या मागल्या पूर्वीच्या अपथ्याला सुरुवात होते, की पुन्हा काही दिवसांनी तोच आजार उत्पन्न होतो. याला कारण आपल्याला कोणत्याही गोष्टींचे सातत्य ठेवणे हेच मुळात शिकवले जात नाही. जर आहारापासून शरीर बनते तर ते निरोगी ठेवण्यासाठी “पथ्यकर आहाराचे सेवन हे सातत्याने घेणे” हे गरजेचे आहे हे आपण शिकतच नाही. ह्याला कारण जीभेचा मोह ! आता हा मोह कसा टाळावा हे तरी कुठे शिकतो आपण? मुलांनी मागितलेल्या सर्व गोष्टी सतत कामांमध्ये व्यग्र असलेले आई आणि वडील त्यांच्या हट्टामुळे आणून देत असतील, तर पुढे जाऊन मुलांना मोहाची लागण नाही झाली तरच नवल! तोच मोह पुढे सर्व इंद्रियांचा ताबा घेतो त्यात रसनेंद्रिय ही आलेच. आयुर्वेद सांगतो,

“आहारसंभवं वस्तु रोगाश्चाहारसंभवा: |” च. सू. २९/४५

योग्य आहाराने शरीर बनते तसेच अयोग्य आहाराने रोग निर्माण होतात. येथे कोठेही बाहेरील पदार्थांमुळे रोग होतात असे सांगितलेले नाही. याचा अर्थ आजकाल होणारे एलर्जी, इंजेक्शन्स यांमुळे होणारे रोग आयुर्वेदात वर्णन केलेले नाहीत का हो? आयुर्वेदात अशा सर्व प्रकारच्या रोगांचे वर्णन आहे. परंतु, आयुर्वेदशास्त्र सांगते की जे कोणत्या प्रकारचे रोग होतात, त्याला कारण तुम्ही घेत असणारा चुकीचा आहार आणि विहार हेच आहे. कारण या चुकीच्या आहार विहारानेच शरीरात दोष निर्माण होतात आणि मग बाहेरच्या जंतूंमुळे ते दोष वाढून रोग निर्माण होतात. याला अगदी योग्य उदाहरण म्हणजे बसमध्ये सर्दी झालेल्या माणसाजवळ उभ्या असणाऱ्या अनेक जणांपैकी काहिंनाच सर्दीचा त्रास होतो. अगदी आत्ताचे उदाहरण द्यायचे झाले तर कोरोना झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वानाच कोरोंना होतोच असे नाही, तसेच जर झालाच तर सर्वांना सर्वच लक्षणे दिसतात असेही नाही आणि दिसलीच तर सर्वांचीच लक्षणे खूप प्रमाणात वाढतात असेही नाही. म्हणूनच ज्यांना डायबेटिस, रक्तदाब यांसारखे आजार पूर्वीपासून आहेत, त्यांचीच लक्षणे अधिक वाढत आहेत. बाकीच्यांची लक्षणे कमी आहेत. तर याचा अर्थ असा की ज्यांच्या शरीरात पूर्वीच दोष अधिक वाढलेले असतात त्यांनाच इन्फेक्शन, अलर्जीसारखे रोग लगेच होऊ शकतात. म्हणजे आपली इम्यूनिटी (प्रतिकारक्षमता) वाढवणे आवश्यक आहे. आत्ता कुठे आम्हाला कोरोनाने हे शिकवले.

आता प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी काय करायचे? सध्या हे डॉक्टरांना विचारावेच लागत नाही. Whatsapp आणि Fb वर इतक्या पोस्ट येतात, की आम्ही रोजच त्यातील काहीतरी करून बघत असतो अथवा रोजच वेगळे काहीतरी घेऊन बघतो. मग काय १० दिवस इम्यूनिटी काढा घेतला की कुठे आम्हाला तोंड येते अथवा मूळव्याधीचा त्रास होतो. अहो, पण तो काढा आमच्या शरीराला सहन होईल का? हा विचार करून आम्ही वैद्यांकडे जात नाही. कारण वैद्यांपेक्षा महान गुरु म्हणजे Whatsapp आणि FB आहेत. हा काढा आणि त्याबरोबर पुन्हा आयुर्वेदातील गुळवेल, च्यवनप्राश आणि आधुनिक शास्त्रात सांगितलेले Vit c, अथवा इतर काही गोळ्याही आम्ही घेतो. कारण हे सर्व मिळून नक्कीच कोरोनाचा एकही जंतू आमच्या शरीरात जाऊ शकणारच नाही याची आम्हाला खात्री असते. येथेही आरोग्याच्या शिक्षणात आपण मागे पडतो. माझ्या शरीराला कश्याची गरज आहे आणि कोणते पदार्थ माझ्या शरीराला हानी पोचवू शकतात हे आम्हाला माहितच नाही. कारण मी माझ्या शरीराचा तसा विचारच केलेला नाही अथवा माझ्या शरीरावर मी कसे लक्ष द्यायला हवे हे मला कोणी शिकवलेच नाही. हे शिक्षण आम्हाला ना शाळेत शिकवले जाते ना कॉलेजमध्ये. त्यामुळे आम्ही त्याबाबत विचारच करत नाही.

आहार घेण्याचे नियम, व्यायाम करण्याचे नियम, दिनचर्या, ऋतूचर्या पालन करण्याचे नियम, स्वस्थवृत्त संबंधी नियम तसेच सदवृत्ताचे पालन याबद्दल आम्हाला माहितीच कोणी देत नाही. शाळा आम्हाला असे काही शिकवत नाही आणि मोठेपणी आम्ही कोणाचे ऐकत नाही त्यामुळे आम्ही हे शिकूही शकत नाही. एकूण काय आरोग्याचे शिक्षण आम्हाला कोणाकडूनही मिळत नाही.

आयुर्वेद सांगतो,...

“त्याग: प्रज्ञापराधिनामिद्रियोपशम: स्मृति:| देशकालात्मविज्ञानं सद्वृत्तस्यानुवर्तनम ||”

आगन्तूनामनुत्पत्तौ एष: मार्गो निदर्शित:| च. सू. ७/ ५३

प्रज्ञापराध म्हणजे धी(बुद्धी), धृती(धारण क्षमता) आणि स्मृति(स्मरणशक्ति) यांचे अयोग्य ज्ञान होणे या प्रज्ञापराधाचा त्याग करावा.

इंद्रियांचे शमन करावे म्हणजेच इंद्रियांच्या आहारी जाऊ नये उदाहरण सुखकर असले तरी सतत मोबाईल/कम्प्युटर पाहत राहणे, मोठ्या आवाजात गाणी ऐकणे इ गोष्टी टाळाव्यात.

देश(आपला निवास आणि कार्यक्षेत्र), काल(चालू ऋतु) आणि आत्मज्ञान म्हणजे स्वत:च्या शरीराचे संपूर्ण ज्ञान मिळवून सदवृत्ताचे पालन केल्यास आगंतु म्हणजेच बाह्य जीवजंतूंमुळे शरीरात होणार्‍या रोगांपासून बचाव सहज करता येऊ शकतो. यापैकी कोणत्या गोष्टी मुलांना शिकवल्या जातात?

पूर्वीच्या राजे राजवाडे यांनी केलेल्या लढाया, अथवा पृथ्वीची रचना, किंवा इतर गणित, शास्त्र, हे विषय अजूनही मुलांना ऑनलाईन शिक्षणाद्वारे पढवल्या जात आहेत. ऑनलाईन शिक्षण तर अजूनच घातक. पुढील पिढीला ४० वर्षांच्या ऐवजी २५ व्या वर्षीच चष्मा लावायचा चंगच जणू सर्व शिक्षणसंस्थांनी बांधला आहे, असे वाटत आहे. अर्थात सध्या प्रत्येक ४ मुलांमध्ये एकाला चष्मा असतोच, डोळ्याला चष्मा लागणे हा चक्षुरेंद्रियाचा रोग नसून ती फॅशन समजली जाऊ लागली आहे, त्यामुळे त्याविषयी न बोलणेच बरे....

गणित इ विषयांचे शिक्षण मुलांना देऊ नये असे अजिबात नाही, परंतु जर जग थांबले आहे, तर थोडे आपणही थांबूयात का? मागे वळून आपल्या चुका शोधुयात का? आणि मुलांना इतर शिक्षणाबरोबरच आरोग्याचे शिक्षण देऊयात का? यासाठी आपल्या देशात निर्माण झालेल्या आयुर्वेद शास्त्राचा थोडा विचार करुयात का?

तर हे सर्व लिहिण्याचा उद्देश असा की, आता खर्‍या अर्थाने आरोग्याच्या शिक्षणाची गरज आहे ती पालक, शिक्षक आणि समाजाला. तरच, पुढच्या पिढीला आरोग्याचे महत्त्व राहणार आहे. नाहीतर, अनारोग्य आणि अराजकता माजयाला अधिक काळ राहिलेला नाही..

Let's be assured that you have a Real Life Insurance Policy with us - SSM Ayurveda Healthy and Pleasant life through Ayurveda.


Follow us

ssmayurveda@instagram

ssmayurveda@twitter

ssmayurveda@youtube


Our website

www.ssmayurveda.com


For more updates, join our telegram group - https://t.me/joinchat/Fknelt9VC-YcAXg4



126 views0 comments

Recent Posts

See All

# आयुर्वेदाच्या नजरेतून……✍️… *वैद्य मेघना बाक्रे*

नवरात्री…भाग १ (अश्विन मासारंभ - अश्विन शुद्ध प्रतिपदा) आदिमाया शक्ती, देवी दुर्गा, महालक्ष्मी, सरस्वती, महाकाली या साऱ्या स्त्रीतत्वांचे...

Comments


Post: Blog2_Post
bottom of page