top of page
Search
Writer's pictureSSM Ayurveda

अनपत्यता (Infertility)

Updated: Feb 21, 2023

© वैद्य मेघना बाक्रे एक दिवस रात्री काही शरीरिक कारणांमुळे अचानक जाग आली. पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करत असताना असे लक्षात आले की संपूर्ण सोसायटीमध्ये ऐकू जाईल अशा आवाजात एका जोडप्याच्या गप्पा रंगात आल्या होत्या. कितीही न ऐकण्याचा प्रयत्न केला तरी त्यातील महिलेचे सर्व बोलणे इतके जोरात होते की कोणालाही सहज ऐकू येईल. असो.

तिच्या बोलण्यात त्यांच्यामध्ये असलेली "अनपत्यता" हा विषय होता. तिचे म्हणणे होते की, अजून मलाच दिवस राहत नाहीयेत..माझ्या नातेवाईकांमध्ये माझ्या वयाच्या अनेक बहिणी, भावजया यांना मुले झाली आहेत. एकीला तर डायबिटीस, बीपी सर्व काही असूनही दिवस राहिले आणि मूल झाले. पण अजून मलाच काही नाही. या विषयाने आमची मात्र झोप उडाली. सध्या ही जवळजवळ प्रत्येक एकाडएक घरातील परिस्थिती आहे.

अनपत्यता हा एक आजार असून त्यासाठी अनेक infertility centers तयार झाली आहेत. अनेक डॉक्टर्स, आणि वैद्य अशाप्रकारे बऱ्याच जोडप्यांना अपत्यप्राप्ती होण्यासाठी प्रयत्न करतात. त्यासाठी स्त्री आणि पुरुष शरीरातील बीजनिर्मितीपासून ते बीजनिर्मिती व्यवस्थित झाल्यानंतरही गर्भधारणा न झाल्यामुळे IUI, IVF सारख्या techniques वापराव्या लागतात. आयुर्वेद वैद्य जोडप्यांच्या शरीराची वमन, विरेचनाद्वारे शुद्धी करून आणि इतर काही औषधी चिकित्सा देऊन अनेकांना अपत्यप्राप्तीचा आनंद मिळवून देत आहेत. या सर्व गोष्टींसाठी वैद्य आणि दाम्पत्य यांचा संयम महत्त्वाचा ठरत आहे.

हे सर्व विषय अनेकवेळा आपल्यासमोर अनेक तज्ञाद्वारे मांडले जातात. त्यावरचे वर नमूद केलेले उपायही सुचवले जातात. पण सध्याची आणि पुढची परिस्थिती बघता आता केवळ या उपायांवर अवलंबून काही सुधारणा होईल असे वाटत नाही, त्यासाठी काही मुळ मुद्दे मी येथे मांडू इच्छिते.

पूर्वी विवाहव्यवस्था ही अपत्यप्राप्तीसाठीच आहे असे मानले जाऊन त्यासाठीच प्रयत्न होत असत. मासिक पाळी वाया जाऊ नये, यासाठी घरातील सर्व मंडळींचे लक्ष लग्नानंतर त्या जोडप्यावर असे. मूल झाल्यानंतर त्याच्या वाढीसाठी जोडप्याला कधीही विशेष प्रयत्न करावे लागत नसतं. घरातील वडीलधाऱ्या मंडळींचा आधार असल्याने मूल वाढवण्याचा ताण नव्हताच. आजही काही मोजक्या घरात अशाप्रकारचे वातावरण आहे. घरातील वडीलधारी मंडळी आणि नव दाम्पत्य यांमध्ये सामंजस्य असेल तर हे सहज शक्य होते. यातूनच पूर्वी एका जोडप्याला अनेक म्हणजे अगदी १०-१२ मुलेही होत असत. सध्या विभक्त कुटुंबाचे परिणाम सर्वच व्यवहारांवर होत आहेत. त्यानंतरच्या काळात जनसंख्या वाढत असल्यामुळे सरकारने एका जोडप्याला दोन मुले अशी चौकट घालून दिली. येथेही कोणते बंधन नव्हते तरी अनेकांनी हा मार्ग स्वीकारला कारण, यामुळे आहे त्या दोन मुलांना वाढवणे आणि पुढे चांगले शिक्षण देणे, वाढत्या महागाईत शक्य झाले. येथे हळूहळू शरीर संबंधांवर बंधने येऊ लागली अथवा जे काही करायचे ते प्लॅनिंग करूनच असे सुरू झाले. यातही काहीजण एकच अपत्यावर थांबू लागले.

पुढे अनेक ठिकाणी वंशवृद्धी ही संकल्पना आली. मग त्यासाठी स्त्रीगर्भ हत्या सुरू झाली. त्यामुळे सध्या पाहिले तर भारतात तरी मुलांची संख्या मुलींपेक्षा अधिक आहे. आता येथूनच पुढे सर्व समस्या पुढे उभ्या ठाकणार असे दिसत आहे.

एक किंवा दोनच मुलांना जन्म द्यायचा म्हणजे त्या गर्भाची योग्य वाढ आणि नंतर त्या बाळाचे संगोपन व्यवस्थित व्हावे यावर भर दिला जाऊ लागला. हे देत असताना गर्भधारणा झाल्यावर ती वाया जाऊ नये यासाठी मग विविध औषधे, इंजेक्शन्स यांचा मारा सुरू झाला. जेणेकरून कृत्रिमरीत्या का होईना ते बाळ जगलेच पाहिजे. त्यातून अशी अनेक प्रकारची होर्मोनल चिकित्सा केल्याने बालकाच्या अनेक व्याधींची सुरुवात झाली. ज्यामुळे त्या बालकाला जन्मापासूनच वेगवेगळे रोग अथवा अनेक allergy यांचा सामना करावा लागला. हा विषय खूप मोठा आहे, तो वेगळाच ठेवूयात.

सध्या अजूनच काही प्रश्न निर्माण झाले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षण. सध्या कोणालाही आपली पदवी पूर्ण करण्यासाठी कमीत कमी २१ वर्ष लागतात. त्यापुढे ४-५ वर्ष पदव्युत्तर शिक्षण म्हणजे ज्याकाळात बीज सर्वात उत्कृष्ट असू शकते त्या काळात ही पिढी शिक्षण घेत असते. पुढे नोकरी करून स्वतः स्थिर होईपर्यंत आजकाल नवीन पिढी लग्नाचे नावही घेत नाही. मुलांची तर तिशीही उलटून जाते. त्यानंतर जर ठरवून लग्न करायचे असेल तर मनपसंत मुलगी मिळेपर्यंत अजून वेळ. लग्नानंतर, तीन चार वर्षे त्यांना एकमेकांसाठी वेळ हवा असतो. एवढे झाल्यावर मग कधी अपत्याचा विचार केला जातो. हे करेपर्यंत मुलीचे वय ३०-३५ वर्ष झालेले असते. त्यामुळे जरी आधुनिकशास्त्र कितीही सांगत असले की, अगदी ४५ व्या वर्षीही आम्ही आपत्यप्राप्ती करून देतो तरी त्यातून फलित होणारे बीज हे किती योग्य आहे, यावरही संशोधने होणे आवश्यक आहे म्हणजेच असे इतक्या उशीरा फलित झालेल्या बीजात पुन्हा अपत्य प्राप्ती होते का? का त्यातील बीजांश कमी झालेला आहे, का नाहीच आहे हे तपासणे सध्या आवश्यक आहे.

आता इथे अजून एक प्रश्न आहे. ज्या स्त्रीची अशाप्रकारे ३५-४० व्यावर्षी गर्भधारणा राहते, तीने आपल्या ६०-७० वय असलेल्या आई आणि सासूकडून अपत्य सांभाळण्याची अपेक्षा तरी का करावी? तसेच जर तिला स्त्रीगर्भ झाला तर पुढे काय तीने तिच्या ८० व्या वर्षी आपल्या मुलीचे अपत्य सांभाळावे? तसेच सध्या तिचे वय जर ४० असेल तर तिचे मूल २५ वर्षाचे होईपर्यंत तिला तरुण असणे भाग आहे...नाही का?...या सर्वांबरोबर घर चालवण्यासाठी अर्थकारण तर आहेच. मग हा सर्व विचार समोर येऊनच सध्याची पिढी या सर्व गोष्टींचा पुनः पुनः विचार करत आहे आणि त्यामुळेच "अनपत्यता" या रोगामागे शारीरिक करणांपेक्षा मानसिक कारणे अधिक आहेत हे दिसून येते. त्या सर्व मानसिक गोष्टींचा परिणाम हा केवळ बीजोत्पादन या गोष्टीशी निगडित नसून शरीर संबंधांवर ही दिसून येत आहे. अजून एक मानसिकता म्हणजे "अपत्य निर्मितीचे ओझे". हे ओझे माझ्यावरच का? मीच का या सर्व गोष्टींना कारणीभूत ? सर्व गोष्टींसाठी मीच का करियर सोडायचे? ही जर भावना मुलींच्या मनात निर्माण होत असेल तर यापेक्षा दुर्दैव ते काय?

यासर्व गोष्टींची कारणे शोधायची ठरवली तर अनेक मुद्दे समोर येतील त्या सर्वांचा परिपाक आपल्यासमोर येऊन उभा ठाकला आहे आणि ती कारणे अशी असावीत असे वाटते.

बदलती जीवनशैली, बाहेर देशातील काही अयोग्य पद्धतीचा आसरा घेण्याची नवीन पिढीची आस, आधुनिक चिकित्सा शास्त्रात झालेली प्रगती जी अनेक बाबतीत कृत्रिमतेकडे नेणारी दिसत आहे, सरकारी निर्बंध, सध्याची मुलींची मानसिकता सध्याचे feminism शी संबंधित रुजणारे विचार (मीच का? आणि मलाच का?) त्यात भरीस भर लिव्ह इन रिलेशनशिपचे नवीन फॅड.

आम्हाला तर या सर्वांचे कारण म्हणजे शिक्षणातील अनेक विविध क्षेत्रांची निर्मिती आणि त्यामध्ये नसलेला दुवा हेच वाटते. आज आरोग्य क्षेत्र, शिक्षण क्षेत्र आणि अर्थशास्त्र ही सर्वक्षेत्रे वेगवेगळी आहेत. त्यांचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे आरोग्याच्या संबंधी असे विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोचतच नाहीत. अर्थकारण हे केवळ काही मोजक्याच विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्याचा विषय आहे असे दिसते.

अर्थात दोष देणार कोणाला...सर्वच मानवनिर्मित

एकदा उडालेल्या झोपेमुळे इतके सारे विचार आम्हा दाम्पत्याच्या मनात आले ते मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न

असे असेल तर पुढचा काळ अजून कठीण वाटत आहे. यावर उपायही आहेत. त्यांचा विचार पुढील लेखात करू…..


Let's be assured that you have a Real Life Insurance Policy with us - SSM Ayurveda Healthy and Pleasant life through Ayurveda.


Follow us

ssmayurveda@instagram

ssmayurveda@twitter

ssmayurveda@youtube


Our website

www.ssmayurveda.com


For more updates, join our telegram group - https://t.me/joinchat/Fknelt9VC-YcAXg4


14 views0 comments

Recent Posts

See All

# आयुर्वेदाच्या नजरेतून……✍️… *वैद्य मेघना बाक्रे*

नवरात्री…भाग १ (अश्विन मासारंभ - अश्विन शुद्ध प्रतिपदा) आदिमाया शक्ती, देवी दुर्गा, महालक्ष्मी, सरस्वती, महाकाली या साऱ्या स्त्रीतत्वांचे...

Comments


Post: Blog2_Post
bottom of page